Friday, September 30, 2011

तीर्थरूप पपांस...तीर्थरूप पपांस,

आयुष्यात तुम्हाला लिहिलेले हे पहिलेच पत्र...माहित नव्हते कि अश्या वेळी लिहावे लागेल जेव्हा ते वाचायला तुम्ही या जगातच नसताल...

         मला जे पटेल तसेच वागणारी मी..काही पटले नाही तर ते बोलणारी मी आणि त्यासाठी तुमच्याशी भांडणारी पण मी...एखादी गोष्ट तुम्ही सांगितली आणि मला नाही पटली तर नाहीच केली मी कधी....
आणि तुम्ही पण अगदी असेच...खूप हट्टी आणि स्वतःच्या मनासारखेच वागणारे...खूप मतभेद होते आपल्यात...शेवटपर्यंत तुम्ही तुमच्या मतांशी आणि मी माझ्या मतांशी प्रामाणिक राहिले...

        आज तुम्हाला जाऊन २५ दिवस झालेत...खरे तर अजून पण विश्वास नाही बसत कि तुम्ही नाहीये..
रात्री पडदा सरकला कि वाटते तुम्ही आला असाल आणि नेहमी सारखे पडदा उघडून आपले पक्षी पाहत असाल...
मला आठवतात ते रात्री १२ वाजता आपली मुलगी घरी आली तरी तिला एका शब्दानेही न बोलणारे पपा...
शेजारचे आजोबा वारले तेव्हा त्यांच्या घरी जाऊन काकूंना थोडे पैसे देऊन बोलणारे कि "ताई, हे थोडे पैसे जवळ असू द्या"...
माझ्या आयुष्यात असे पाहिलेली पहिली व्यक्ती म्हणजे माझे पपाच...
 मनस्वी जगणे म्हणजे काय हे कोणी तुमच्याकडून शिकावे...

      ३ महिन्यांपूर्वी घरात सगळ्यांसमोर मला सांगणारे तुम्हीच, " अनिता तुला ज्याच्याशी करायचे आहे त्याच्याशी लग्न कर....तुला कोणाचाही कसलाही विचार करायची गरज नाहीये...स्वतःच्या मनाला वाटेल तसेच वागावे नेहमी आपण...तू माझी मुलगी आहे, आणि माझ्यासारखेच वाग "....असे सांगणारे पपा कोणाला मिळतील का कधी?
"पत्रिका वगेरे बघायची गरज नाहीये...Weak Heart लोक पत्रिका बघतात, आणि माझ्या मुलींना  त्याची काहीच गरज नहिये...तेवढा विश्वास आहे माझा त्यांच्यावर..." कोणाचे वडील असे आपल्या मुलीला सांगतील का कधी?
      ग्रंथालयात जाऊन पुस्तक आणल्यानंतर ते एकाच रात्री वाचणारी मी, आणि पुढच्या रात्री तेच पुस्तक संपवणारे तुम्ही...
ओंकारला त्याच्या मित्रांसोबत ice-cream खायला घेऊन जाणारे फक्त तुम्हीच...
झाडांवर, पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणारे तुम्ही...
आजही आपल्या घरात माणसांपेक्षा आपल्या पक्ष्यांचीच संख्या जास्त आहे....

       आज जेव्हा डोळे बंद करून या सगळ्याचा विचार करते ना, तेव्हा एकाच गोष्ट कळते, कि आज जर माझ्यात एक जरी चांगला गुण असेल ना तर तो फक्त तुमच्यामुळे पपा...आयुष्यात जर मी कधीही काहीही चांगले केले असेल किंवा करेन ते फक्त तुमच्यामुळे... माझ्यात जो काही निर्भीडपणा आहे तो तुमच्यामुळेच...
आज माझ्यात जी काही माणुसकी आहे असेल ती फक्त तुमच्यामुळेच..
आणि हे सगळे तुम्ही कधीच शब्दात नाही सांगितले...मी हे शिकत गेल्या ते तुम्हाला पाहून...
आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी कधीच काहीही न बोलणारे पपा होते माझे..
मी एक मुलगी असून सुद्धा मला कधीच तुम्ही मुलीसारखे वागवले नाहीत...
प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र दिलेत तुम्ही मला...प्रत्येक...

     THANK YOU for everything.....
LOVE YOU PAPA...आणि MISS YOU FROM BOTTOM OF MY HEART.......

No comments:

Post a Comment